नंदुरबारात पत्रकाराने साकारली बाळासाहेबांची वेशभूषा; चाहत्यांची गर्दी

0

नंदुरबार-ठाकरे चित्रपटाच्या पहिल्याच शोमध्ये नंदुरबार शहरात बाळासाहेब ठाकरे प्रकटल्याने त्यांना पाहण्यासाठी शिवसैनिकांसह चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांच्यासह अनेक जणांनी त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सेल्फी देखील काढला. नंदुरबार येथील मिराज सिनेमागृहात आज २५ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यावर आधारित ठाकरे हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी पहिला शोला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपात रणजित राजपूत हे तेथे दाखल झाले.

त्यांच्या पेहराव्यामुळे ते हुबेहूब बाळासाहेब दिसत होते. त्यांना पाहण्यासाठी शिवसैनिकांसह चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. सेनेचे जिल्हाप्रमुख मोरे यांना देखील सेल्फीचा मोह आवरता आला नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका करण्याची इच्छा आहे आणि ती मी करतोय अशी भावना रणजित राजपूत यांनी व्यक्त केली. रणजीत राजपूत हे नंदुरबार येथील ज्येष्ठ पत्रकार असून ते एक चांगले कलाकार देखील आहेत. गायनाबरोबरच मराठी, अहिराणी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे म्हणून त्यांच्यातला एक कलाकार जागृत झाला होता, कॉमेडी पत्रकार म्हणून त्यांची ओळख असली तरी बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा केल्यानंतर ते गंभीर बनले होते.