नंदुरबारात मेडिकल कॉलेज होणार!

0

नंदुरबार । सुमारे 600 कोटी रूपये खर्चाच्या मेडीकल कॉलेजला मंजुरी मिळाली असून येत्या जुलैच्या अधिवेशनात पुरवणी मागणी होणार आहे, अशी माहिती आरोग्य संचालक प्रविण सिंगारे यांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्यदूत रामेश्‍वर नाईक संदीप जाधव, जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलतांना आरोग्य संचालक म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्याची वास्तवता पाहता या ठिकाणी मेडीकल कॉलेज असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडीकल कॉलेजला मंजुरी दिली असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

जिल्हा शंभर टक्के तंटामुक्त करा: जिल्हाधिकारी
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम अभियानात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन नंदुरबार जिल्हा येत्या काळात शंभर टक्के तंटामुक्त होईल असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम संदर्भात बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण राकेश महाजन, उप विभागीय पोलीस अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे तंटामुक्त काम पाहणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी म्हणाले की, सन 2007 मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम सुरु केली असून मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तंटामुक्त गांव झाल्यास त्या गावात विविध विकासाची कामे चांगली होतात यात ग्रामसभेचा मोठा सहभाग असतो. नंदुरबार जिल्हा पेसा कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आवश्यक ते निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. ही मोहिम जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. घमंडे, यांनी यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेबाबत माहिती दिली.

2018 पर्यंत कॉलेज सुरू होणार
मेडीकल कॉलेजच्या या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रूपये खर्च येणार असून सन 2018 पर्यंत हे कॉलेज सुरू होईल. पहिल्या बॅचसाठी आवश्यक सुविधा जिल्हा रूग्णालयात उपलब्ध असून सन 2019 पर्यंत कॉलेज पूर्ण क्षमतेने उभे राहणार आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुलैमध्ये होणार्या अधिवेशनात मेडीकल कॉलेजसाठी पुरवणी मागणी करण्यात येणार असून ऑगस्टमध्ये टेंडर प्रक्रिया सरू होणार आहे. पहिल्या वर्ष 40 डॉक्टरांची पदे भरण्यात येवून 400 डॉक्टरांना प्रमोशनवर या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य संचालक प्रविण सिंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.