नंदुरबार : वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांवर कारवाईसाठी शुक्रवारी, 24 पासून ई-चलन प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या उपकरणांचे वाटप पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते कर्मचार्यांना करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक भोये, राहुल शेजवळ उपस्थित होते. दरम्यान, वाहनचालकांकडून ऑनलाईन दंड आकारणे व वाहनधारकांना कारवाईबाबत एसएमएसद्वारे सुचीत करण्यात येणार आहे.
शहरातील वाहतुकीची समस्या मोठी आहे. वाहतूक कर्मचार्यांना त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. उन, वारा, पाऊस अशा वातावरणात काम करतांना दंडाची पावती फाडावी लागते. अशावेळी वाहनचालकांकडून वादही घातले जात असतात. त्यामुळे कारवाईत अडथळा येतो. ही बाब लक्षात घेता मोठ्या शहरांमध्ये ई-चलन प्रणालीचा वापर केला जातो. त्याचाच वापर आता नंदुरबारातही करण्यात येणार आहे. नंदुरबारात ही प्रणाली यशस्वी झाल्यास शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा येथे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
याअंतर्गत वाहनधारकाने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना ई-चलन उपकरणाद्वारे ऑनलाईन पद्धतीने दंड आकारण्यात येणार आहे. याद्वारे एटीएम किंवा डेबीट कार्डद्वारे दंडाची रक्कम किंवा पेमेंट भरता येणार आहे. वाहनधारकांना त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत एसएमएसची सुविधा उपलब्ध होणार आहे. तत्पर कारवाईचे फोटो घेण्याची सुविधाही राहणार आहे. नागरिकांसाठी महाट्रॅफिक अॅपची सुविधा राहील.
या उपकरणांचे वितरण वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांना 24 रोजी करण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयात संजय पाटील यांनी त्यांचे वितरण केले. यावेळी त्यांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या कामाला गती देण्याचे आवाहन कर्मचार्यांना केले. वाहतुकीचे नियोजन सुव्यवस्थित करून कारवाई करतांना सौजन्याने वागावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.