नंदुरबारात हाणामारीत तरूणाचा मृत्यू

0

नंदुरबार । हाणामारीत तरूणाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या जमावाने साक्री नाका, चौधरी गल्ली या भागात दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे दंगलीची अफवा पसरल्याने शहरात धावपळ सुरू झाली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्याबरोबरच सौम्य लाठीमार देखील केला. या घटनेनंतर संपूर्ण नंदुरबार शहरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

जमावाने दगडफेक करत केली तोडफोड
दरम्यान या घटनेचे दुसर्‍या दिवशी म्हणजे आज 18 एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी पडसाद उमटले. आदिवासी समाजातील तरूणाचा खून झाल्याचा राग मनात धरून हजारो तरूणांचा जमाव सुरूवातील नवापूर चौफुलीवर जमला. तेथून या जमावाने उग्ररूप धारण करत बायपास रस्त्यावरील एका धाब्यासमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहने जाळली. त्यानंतर या जमावाने आपला मोर्चा साक्रीनाका, भाटगल्ली, चौधरी गल्ली या भागात वळविला. येथे आल्यानंतर जमावाने दगडफेक करीत गल्लीत अंगणात उभ्या असलेल्या चार चाकी, दोन चाकी वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यामुळे 10 ते 15 वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जमावाचा हा तांडव पाहून या भागातील नागरिकांनी पटापटा दरवाजे बंद करून जीव मुठीत घेवून स्वतःला घरात कोंडून घेतले. त्यामुळे या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली. लाठीमार देखील करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

बाजारात सर्वत्र धावपळ
हा जमाव मंगलबाजार सुभाष चौक या परिसरात आल्याने बाजारात सर्वत्र धावपळ झाली. दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार सुरू होता. अक्षयतृतीया असल्याने अनेक जण मंगल बाजारात सुभाषा चौकात आंबे, डांगर, मडकी खरेदी करण्यासाठी आले होते. परंतु दंगलीची अफवा पसरल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाला. सणउत्सव असून देखील नंदुरबार शहरात संचारबंदी सारखी परिस्थिती दिसून आली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक संजय पाटील, उपअधिक्षक रमेश पवार, पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जुन्या भांडणाच्या वादात मारहाण
याबाबत अधिक वृत्त असे की, पोलिस वसाहतीत राहणारा रवींद्र सोमा सोनवणे (वय 25 वर्ष) या आदिवासी तरूणाचा साक्रीनाका भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. या वादातूनच रवींद्र सोनवणे या तरूणाचा खून झाल्याची घटना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याची वार्ता पसरताच एका जमावाने रात्री साक्रीनाका भागात दगडफेक केल्याने धावपळ उडाली. पोलिसांनी या भागात वाढीव बंदोबस्त लावल्याने रात्री शांतता पसरली होती. याबाबत मयत तरूणाचे वडील सोमा सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून बर्फ फोडण्याच्या कोचाने व लागडी दांड्याने मारहाण करण्यात आल्यामुळे रवींद्रचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गोलू रघुनाथ चौधरी, जयदीप रघुनाथ चौधरी, लकी दिपक चौधरी, सुनिल ईशी या चार जणांविरूद्ध भादंवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.