नंदुरबार। ट्राफिक पोलीस म्हटला म्हणजे गाडी अडवून पावती फाडणे, असा दृष्टीकोन नागरिकांच्या मनात असतो. मात्र खाकी वर्दीतल्या माणसाचे दर्शनही कधी-कधी घडत असते. नंदुरबार शहरात ड्युटी बजावणार्या वाहतूक शाखेच्या पोलिसांचेही सध्या माणुसकीचे दर्शन नंदुरबारकरांना होत आहे. येणार्या-जाणार्या दुचाकी वाहनांमुळे आजीला रस्ता क्रॉस करणं अवघड झाले ही बाब लक्षात घेवून तेथे उभे असलेले वाहतूक शाखेचे पोलिस संजय साळी यांनी आजीबाईचा हाथ धरून हळूवारपणे रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत केली. यावेळी खाकी वर्दीतल्या माणसाचे दर्शन सारा नेहरू चौक पाहत होता, अनं पोलिसांबद्दल आपुलकीची भावना व्यक्त करीत होता. त्या आजीबाईच्या चेहर्यावर देखील समाधानाचे भाव दिसून आले.
प्रचंड गर्दीमुळे रस्ता ओंलाडणे जिकरीचे
सध्या उन्हाचा पारा प्रचंड चढला आहे. अशातच बहुतेक जण कामानिमित्त बाहेर पडतात. शहरातील नेहरू पुतळा परिसर म्हणजे वदळीचा चौक या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होवून रस्ता क्रॉस करणे जिकरीचे असते. काल भरदुपारी एक आजी रस्ता क्रास करण्याचा प्रयत्न करीत होती. असेच दर्शन श्रॉफ हायस्कुलच्या परिसरात पाहावयास मिळत असते. या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी होवून शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ता ओंलाडणे जिकरीचे होते. अशावेळी तेथे ड्युटीला असलेल्या महिला पोलिस कर्मचारी त्या शाळकरी मुलांचे हाथ धरून रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतांना नेहमीच दिसून येत असतात. वाहतूक शाखेच्या पोलिसांमध्ये फुटलेला माणुसकीचा झरा पाहून नागरीक आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहत नाही. ही शिकवण वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मोहकर आप्पा यांची असल्याची जाणीव आता होवू लागली आहे.