नंदुरबार जिल्हा पर्यटनावर ‘नंदनवन’ माहितीपटाचे आज प्रसारण

0

नंदुरबार। रा ज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत असून 2017 हे वर्ष व्हीजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून शासनामार्फत साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पर्यटनावर आधारित ‘नंदनवन’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली असून या माहितीपटाचे प्रसारण गुरुवार 4 मे 2017 रोजी रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.

30 मिनिटांत जिल्ह्याची खबरबात
सुमारे 30 मिनिटांच्या या माहितीपटाची निर्मिती ना. रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ब्रिज कम्युनिकेशन, जळगाव यांनी केली आहे. या माहितीपटाची संकल्पना व संशोधन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांची असून संशोधन सहाय्य अर्चना देशमुख, दिनेश चौरे, बंडू चौरे यांनी केले आहे. लेखन, दिग्दर्शन मिलिंद पाटील यांनी केले आहे. रात्री साडेनऊच्या बातम्या संपल्यानंतर दहा ते साडेदहा या वेळेत या माहितीपटाचे प्रसारण केले जाणार आहे.

पर्यटनाला चालना देणारा माहितीपट
सारंगखेडा चेतक महोत्सव, काळमदेव, प्रकाशा, मोड- चैतन्यश्वेर, रावलापाणी, हजरत इमाम बादशाह दर्गा या पर्यटन व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचा होळी हा महत्वाचा सण आहे. होलिकोत्सवाचेही ब्रॅण्डिंग करण्यात येत आहे. पर्यटनाला चालना देणार्‍या पर्यटनस्थळांच्या माहितीचा समावेश असल्याने हा माहितीपट जिल्हावासीयांनी अवश्य पाहावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी केले आहे.

जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणार
सर्वाधिक रोजगार देवू शकणार्‍या आणि वेगाने विस्तार होणार्‍या क्षेत्रापैकी पर्यटन हा एक उद्योग आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून विस्तीर्ण अशा सातपुड्याच्या रांगा आहेत. या रांगांमध्ये महाबळेश्वरनंतर राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. सांगरखेडा येथील यात्रा आहे. अस्तंबा यात्रा आहे. या जिल्ह्यातून तापी आणि नर्मदा नदी वाहते. तापीवरील प्रकाशे व सारंगखेडा बॅरेजमध्ये बारमाही पाणी उपलब्ध होते. तेथे बोटिंग सुरू करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. याशिवाय गरम पाण्याचे झरे उनपदेव येथे आहेत. प्रकाशासारखे तीर्थक्षेत्र या जिल्ह्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र व तीर्थ क्षेत्राच्या विकासातून जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री रावल यांचा मानस आहे.