नंदुरबार। शासनाच्या बंदी घातलेल्या राशी 659 बीटी वाणाच्या बियाण्यांचा नंदुरबार जिल्ह्यात सुळसुळाट वाढला असून त्यामुळे शेतकर्यांच्या शेती उत्पादनांवर परिणाम होणार असल्याची भिती व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या बोगस बियाणे विक्री करणार्या दुकानदारांवर कृषी विभागाच्या पथकांकडून थातूर-मातूर कारवाई होत असल्याने पथकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शासनाने राशी 659 या बीटी वाणाच्या कपाशीच्या बियाण्यावर बंदी घातली आहे. असे असतांना नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश बियाणे विक्रेत्यांकडे या बोगस बियाण्यांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारीनुसार कृषी विभागाचे जिल्हास्तरीय पथक दुकानांची तपासणी करतात. मात्र ही तपासणी गुलदस्त्यातच असल्याचा प्रकार समोर येत आहे.
कृषी विभागाची कारवाई संशयास्पद
तळोदा येथे जिल्हास्तरीय पथकाने एका बियाणे विक्रीच्या दुकानावर धाड टाकून उपलब्ध असलेल्या बियाण्यांची तपासणी केली. काही त्रुट्या आढळून आल्याने बियाणे विक्रीला मनाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनुप उदासी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्या दुकानावर कोणते बोगस बियाणे आढळून आले याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. म्हणून कृषी विभागाच्या भरारी पथकांच्या कारवाईबाबत शंकेची पाल चुकचुकायला लागली आहे. आठ दिवसापूर्वीच प्रकाशा येथे देखील बियाण्यांची तपासणी झाली. परंतु तेथील कारवाईचेही अद्याप गौडबंगालच आहे. शेतकर्यांच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेत बहुतांश दुकानांमध्ये बोगस बियाणे विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. याबाबत ठोस कारवाईची मागणी शेतकर्यांकडून होवू लागली आहे.