नंदुरबार पंचायत समितीचा लाचखोर कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

2000 Bribe : Bribery Junior Assistant In Nandurbar in ACB’s Net नंदुरबार :  महागाई भत्त्याच्या फरकाबद्दल तसेच सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्‍या हप्त्याचे बिल काढल्याबद्दल पाच हजारांची लाच मागून तडजोडीअंती दोन हजारांची लाच स्वीकारणार्‍या नंदुरबार पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक प्रकाश गोविंदा निकवाडे (55, वर्षी, ता. शिंदखेडा) यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने अटक केल्याने शिक्षण विभागातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चहाच्या टपरीवर स्वीकारली लाच
58 वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना जानेवारी 2022 पासूनच्या काढलेल्या महागाई भत्त्याच्या फरकाबद्दल तीन हजार तसेच सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्‍या हप्त्याचे बिल काढल्याबद्दल दोन हजारांची लाच शुक्रवारी नंदुरबार पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक प्रकाश गोविंदा निकवाडे (55, वर्षी, ता. शिंदखेडा) यांनी मागितली होती मात्र दोन हजारात रुपयात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी पंचायत समिती नंदुरबार कार्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या गणेश टी स्टॉलवर संशयीताने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी वाघ, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, अमोल मराठे, मनोज अहिरे देवराम गावीत, ज्योती पाटील, संदीप नावाडेकर, जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.