नंदुरबार । निसर्गाचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी केवळ शेणाच्या गोवर्या, कापडी चिंध्या जाळून इको फे्रंडली होळी करण्याची परंपरा येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाने जिल्ह्यांत कायम राखली आहे. इको फे्ंरडली होळीचे हे 27 वे वर्ष आहे. पर्यावरणाचा र्हास होत असतांना अनेक हौशी दरवर्षी होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करतात. मात्र, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे 1990 पासून लाकुड रहीत होळी साजरी करण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी मंडळ 27 वर्षांपासून कार्यरत आहे. होळीमध्ये शेणाच्या गोवर्या, जुन्या-नव्या कापडाच्या चिंध्या वापर करण्यात येत आहे. या होळीद्वारे सामजिक संदेश दिला जातो.
जल बचतीची जागृती
धुलीवंदन किंवा रंगपंचमीला घातक व रायनिक रंगांचा वापर टाळला जातो. धुलीवंदनाला होणारी पाण्याची नासाडी थांबवून जल बचतीचा संदेश दिला जातो. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्यासह संजय चौधरी, आनंदा घुगरे, ईश्वर ठाकूर, काशिनाथ गवळी, कैलास ढोले, डॉ. गणेश ढोले, संभाजी हिरणवाळे, विशाल हिरणवाळे यांचा मोठा
सहभाग असतो.
झाडे लावा झाडे जगवाचा संदेश
दरवर्षी, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे बालवीर चौकांत होळी प्रज्वलीत करण्यात येत असते. तत्पूर्वी परिसरातील महिला आणि बेटी बचाव अभियानांतर्गत शालेय तथा महाविद्यालयीन युवतींच्या हस्ते तुळशी, आंबा, कडूलिंब, पेरू आदी रोपांची विधीवत पुजा केली जाते. यानंतर या रोपांची लागवड करून झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देवून जनजागृती केली जाते.
गुटख्याच्या पुड्यांची होळी
मंडळाचे कार्यकर्ते मानाच्या बालाजी वाड्यातील होळीतून मशाल पेटवून आणल्यानंतर बलवीर चौंकातील होळी त्या मशालीच्या सहाय्याने पेटवित असतात. इको फे्रंडली म्हणजेच पर्यावरण पुरक होळी साजरी करतांना गुटख्याच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी व्यसनमुक्तींचा संदेश देण्यासाठी गुटख्याच्या पुड्यांना जाळण्यात येते. यासोबतच दहशतवाद, भ्रष्टाचार आदी फलकांचे प्रतिकात्मक दहन करण्यात येते.