नंदुरबार सिंधी युवा मंचतर्फे आयोजित शिबिरात ५८ दात्यांचे रक्तदान

0

नंदुरबार:सिंधी युवा मंचतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ५८ दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्त्वाची जाण करुन दिली. कोविड-१९ मुळे जागतिक महामारी काळात लोकांत आपल्या आरोग्याविषयी भय असतांना सुध्दा येथील सिंधी युवा मंचतर्फे रक्तदान शिबीर घेवून सामाजिक बांधिलकी जोपासली.

शिबिराची सुरुवात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहराध्यक्ष मोहन खानवाणी, नगरसेवक कमल ठाकूर यांच्या हस्ते संत जय झुलेलाल महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन झाली. शिबीरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परंतु कमी हिमोग्लोबीनमुळे काही इच्छुक महिला रक्तदात्यांना परत पाठविले व पाच महिलांनी रक्तदानास पात्र राहुन रक्तदान केले. दरवर्षी सिंधी दिवस अर्थात चेट्री चंद्र निमित्त सिंधी युवा मंच व झुलेलाल सेवा मंडळतर्फे रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्यात दरवर्षी चढत्या क्रमाने जास्तीत जास्त रक्तदान करतात. यावर्षी कोविड-१९ महामारीमुळे लॉकडाऊनकाळात चेट्री चंड नेहमीप्रमाणे साजरा करता आला नाही. मात्र, लॉकडाऊन ५ मध्ये बरीच शिथिलता मिळाल्यामुळे आणि उन्हाळयामुळे वाढती रक्ताची मागणी लक्षात घेता जनकल्याण रक्तपेढीतर्फे सिंधी युवा मंच व झुलेलाल सेवा मंडळ यांना आवाहान करण्यात आले. त्यास प्रतिसाद देत संस्थाच्या संयुक्त विद्यमाने गुरुजोदर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

यावेळी सिंधी युवा मंचचे कमल ठाकुर, अजय संगतरामाणी, रवि नानकाणी, कमलेश रंगलाणी, संजय मंगलाणी, दिपक सेवलाणी, सतीश सेवलाणी, अनिल मंदाणा, आपु मताणी, संदीप गुरुबक्षाणी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. शंकरलाल रंगलाणी, चंदर मंगलाणी, शंकर तलरेजा व इतर समाज मान्यवरांचे सहकार्य लाभले. डॉ.अनुप कटारिया व डॉ.यश कटारीया या बंधुंनी एकाच वेळेस रक्तदान करुन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. त्याबदद्ल त्यांचे कौतुक करण्यात आले. जनकल्याण रक्तपेढीतर्फे कोषाध्यक्ष योगेशभाई पारेख, डॉ.अर्जुन एच.लालचंदाणी, डॉ.राजेश केसवाणी व कर्मचारी वृदांनी रक्त संकलनास सहकार्य केले.