अमळनेर । येथील जनतेची दिशाभूल करून जातीपातीचे राजकारण केल्याने अमळनेरात सुरवातीला जे चुकून चालले त्यात आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांना अमळनेर पालिका निवडणुकीत जनतेने नाकारल्यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या नंदुरबारमध्येही नाकारल्याने त्यांचे कर्तृत्व व किंमत काय हे स्पष्ट झाले असून यापुढे अश्यांना अमळनेरकर जनता मुळीच थारा देणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल भाईदास पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
थोड्याच दिवसात चौधरी बंधूंचे पितळ उघड पडणार
पालिकेच्या निवडणुकीत जनतेने विधानसभा निवडणुकीत झालेली चूक सुधारत चौधरी बंधूचा दारूण पराभवाचे तोंड दाखवले असताना त्यांनी अनिल भाईदास पाटीलच्या वादामुळे आमचा पराभव झाला, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. नंदुरबारकरांसमोर देखील त्यांनी हेच कारण पुढे करून आपला नैतिकतेच्या बळावर झालेला पराभव लपविला होता, मात्र नंदूरबार पालिकेच्या निवडणुकीत कोण आडवा आला, याचा खुलासा यांनी करावा? शेवटी अमळनेरची असो की, नंदुरबारची दोन्हीकडे सूज्ञ जनता आहे. सुरवातीला अडीच वर्षे यांनी अमळनेर पालिकेची सत्ता ताब्यात घेऊन विकासाचा खोटा आव आणून व जनतेची दिशाभूल केली आणि विधानसभेत आमदारकी पदरात पाडून घेतली, परंतु थोड्याच दिवसात त्यांचे पितळ उघडे पडू लागल्याने जनता यांच्यापासून दूर गेली.
जाती पतीचे बीज रोवून जनतेची दिशाभूल केली
यानंतर नगरपालिका निवडणुकीत देखील जाती पातीचेच बीज रोवून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनता जनार्दनास एकदा झालेली चूक समजली असल्याने जनतेने प्रचंड धोबी पछाड देऊन यांना घरचा रस्ता दाखविला. मात्र त्यांनी माझ्यासोबत केलेल्या वादाचे कारण पुढे करून पराभव लपविला. अमळनेरात आता थारा मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर डॉ. रवींद्र चौधरीने नंदुरबारकर जनतेची दिशाभूल करण्यास सुरुवात करून तेथील पालिका निवडणुकीत भाजपाचा सहारा घेत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथील जनता यांना आधीच ओळखून असल्याने कोणताही फंडा यांच्यावर चालला नाही. यामुळे कर्मभूमीतच दारून पराभव यांचा झाला. यामुळे अमळनेर कर जनतेचे डोळे आता पूर्णपणे उघडले असून भविष्यात कोणत्याही परिस्थितीत त्यांना स्थान मिळणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.