नक्कीच यशस्वी उद्योजक होऊ शकता:आयुक्त श्रावण हर्डीकर

0
पिंपरी:स्वप्न नेहमी मोठे पाहिले पाहिजे. मोठे ध्येय ठेवले पाहिजे आणि त्यानुसार वाटचाल करावी. भविष्याचा विचार करून आपल्या आयडीया मार्केटमध्ये पडताळून पाहिल्या पाहिजेत. भविष्यात आपली आयडीया किती वर्षे टिकू शकते याचा विचार करून वेळीच त्याला मूर्त स्वरूप दिल्यास, नक्कीच यशस्वी उद्योजक होऊ शकता, असे मार्गदर्शन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य अमित गोरखे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमधील नवोदित उद्योजकांना नवीन उद्योगाबाबत माहिती देण्यासाठी मोफत उद्योजकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात प्रथमच स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हे शिबिर पार पडणार आहे. त्याच्या शुभारंभाप्रसंगी आयुक्त बोलत होते. चिंचवड, संभाजीनगर येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये शनिवारी झालेल्या कार्यक्रमाला ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, शिक्षण मंडळाच्या उपसभापती शर्मिला बाबर, नगरसेवक तुषार हिंगे, महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन, पुणे स्मार्ट स्टार्टअपचे रवी घाटे, तुषार शिंदे, अक्षय सरोदे आदी उपस्थित होते. याशिवाय उद्योजकता शिबिरात सहभागी होण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपयश आल्यास खचू नये ,
आयुक्त हर्डीकर पुढे म्हणाले की, सर्वांना सामान्यपणे जगणे चांगले वाटते. सामान्य राहायचे हे मनावर लादून घेतले असून ही मानसिकता चुकीची आहे. ज्ञानाचे मोठे क्षेत्र आहे. ते आत्मसात करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपयश आल्यानंतर खचून जाऊ नये, दुसर्‍यावर आणि नशिबावर त्याचे खापर फोडू नये. अपयशावर मात करणे गरजेचे आहे. स्टार्टअप संस्कृतीचा विकास जसा पुणे व इतर शहरात झाला, तसा पिंपरी-चिंचवड शहरात झाला नाही. त्यासाठी महापालिकेच्यावतीने देखील स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर लवकरच सुरू करून शहरातील स्टार्टअप्सना एका छताखाली सर्व सुविधा (इकोसिस्टिम) उपलब्ध करून देण्यात येतील. अमित गोरखे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर हे देशातील बहुधा पहिलेच क्राऊड-फंडेड मॉडेल असावे. अशा प्रकारच्या जनासहभागाच्या प्रयत्नांनीच स्टार्टअप ना आधारभूत सुविधा उपलब्ध होऊन असे स्टार्टअप शहराचे नाव देशात उंचावतील. सहा आयडीया जेव्हा येतात तेव्हा एक आयडीया यशस्वी होते. त्यामुळे आपली आयडीया योग्य आहे की नाही याचा विचार करत न बसता उद्योगाला सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रगती होत राहते. जग नवीन गोष्टी लगेच स्वीकारते. त्यासाठी नावीन्यपूर्ण करण्याचा विचार करावा.