नगरदेवळा सरपंचपदी सिंधुताई महाजन

0

सेनेची 20 वर्षाची सत्ता कायम

नगरदेवळा – येथे आज रोजी सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत 17 पैकी 10 सदस्यांनी एकमताने सिंधुताई महाजन यांना हात उंच करून मतदान केले व पुन्हा नगरदेवळा ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकल्याने नगरदेवळा ग्रामपंचायतवर शिवसेनेने 20 वर्षाची सत्ता कायम राखत आपले वर्चस्व सिद्ध केले. नगरदेवळा येथील सरपंच सुनंदा पाटील हे अतिक्रमणाच्या कार्यवाहीमुळे अपात्र झाल्याने गेल्या 3 महिन्यांपासून सरपंच पद रिक्त होते व त्यांच्या जागेवर प्रशासक म्हणून विस्ताराधिकारी आर.टी. सैंदाणे हे ग्रामपंचायतीचा कार्यभार बघत होते. बुधवारी 7 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरवात करण्यात आली. सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली, त्यात सिंधुताई महाजन यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज असल्याने शिवसेनेच्या सिंधुताई सुधाकर महाजन यांची बहुमताने एकतर्फी निवड करण्यात आली.

17 पैकी 10 सदस्यांनी मतदान केल्याने निवड बिनविरोध
17 पैकी 10 सदस्यांनी मतदान केल्याने सिंधुताई महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजपूत यांनी जाहीर केले. नवनियुक्त सरपंच यांच्यापुढे मुख्यतः गावात वाढत असलेले अतिक्रमण, सर्वत्र पसरलेलं घाणीचे साम्राज्य, रखडलेला नोकरपगार, बंद असलेले पथदिवे, व महिला शौचालय यांची असलेली दुरवस्था हेच प्रश्‍न प्रामुख्याने असणार आहेत. दरम्यान गावाच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी राजकीय जोडे बाहेर काढून एकत्र यावे व गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नवनिर्वाचित सरपंचा सिंधुताई महाजन यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून मंडळाधिकारी पी.बी. राजपूत यांच्यासह विस्ताराधिकारी सैंदाने, तलाठी कैलास बहिर, ग्रामविकासअधिकारी ए.एम. राठोड, कोतवाल कैलास धिवरे यांनी काम पाहिले.