नगरपालिका कर्मचार्‍यांचे जूनपासूनचे पगार सहाव्या वेतनानुसार

0

मंत्रालयातून निघाले तोंडी आदेश ; शिक्षण विभागाचा गलथान कारभार

फैजपूर- राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून सातवा वेतन आयोग जाहीर केला मात्र नगरपालिका कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2019 पासून तर मे 2019 पर्यंत हे पाच पगार सातव्या वेतन आयोगानुसार मिळाले मात्र जून महिन्याचे पगार पत्र जिल्हा परीषद शिक्षण विभागाने स्वीकारले नसल्याने मंत्रालयाच्या आदेशानुसार सहाव्या आयोगानुसार पगार नगरपालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना देण्यात यावे, असे तोंडी आदेश आले आहेत. याबाबत नगरपालिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची रविवारी भेट घेऊन निवेदन दिले. यामुळे पुन्हा शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार
फैजपूर नगरपरीषद संचलित म्युनीसीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग मंजूर झालेला असून या सातव्या आयोगानुसार वेतन 1 जानेवारी 2016 पासून शिक्षण विभाग जिल्हा परीषद, जळगाव यांनी वेतनश्रेणी निश्चित केलेल्या आहेत व त्यानुसार माहे जानेवारी 2019 ते मे 2019 चे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार या कर्मचार्‍यांना दिले गेले आहे मात्र जून 2019 चे वेतन देयक बिले जिल्हा परीषद शिक्षण विभाग जळगाव यांनी स्वीकारलेले नाही. माहे जून 2019 चे वेतन देयक हे सहाव्या वेतन आयोगानुसार सादर करावे, अशा तोंडी सूचना मंत्रालयातील शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शासन नियमानुसार नगरपरीषद शाळांना व खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना एकाच वेळी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे त्यानुसार जानेवारी 2019 ते मे 2019 या कालावधीत चे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार प्राप्त झालेले आहे. मात्र शिक्षण विभागाकडून जून 2019 चे वेतन हे सहाव्या आयोगानुसार मिळेल, असे मंत्रालयाच्या शिक्षण विभागाकडून तोंडी आदेश देण्यात आलेले आहे. सर्व नगरपरीषद संचलित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अन्यायकारक व सापत्न भावाची वागणूक शिक्षण विभाग देत आहे. आम्हा कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार अदा करण्यात यावे, असे आशयाचे निवेदन माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. या निवेदनावर नगरपालिका मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.