अमळनेर । महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विभाग लेखाशीर्षकाखाली अमळनेर पालिकेस 3 कामांसाठी 30 लाखांचा निधी मंजूर झाला असून यातून शहरातील तीन विकासकामे मार्गी लागतील व सदर कामासाठी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यानी शिफारस केली होती अशी माहिती विधान परिषदेच्या सदस्या आ स्मिता वाघ यांनी दिली. अमळनेर सोबतच एरंडोल पालिकेसाठीही आमदार वाघ यांच्या प्रयत्नानेच 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सदर निधीतून अमळनेर शहरात शाहआलंम नगरमध्ये रस्ते काँक्रिटीकरणासाठी (10 लाख), फाफोरे रस्त्यावरील खातेश्वर कब्रस्थान येथे अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, 10 लाख व तांबेपुरा भागातील कब्रस्थान येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे, 10 लाख आदी कामे होणार आहेत.
निधी आल्याने नागरीकांमध्ये समाधान
या कामांमुळे सर्व मुस्लिम समाज बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत असून समाजाने आमदार स्मिता वाघ याचे आभार व्यक्त केले आहेत. सदर कामासाठी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील या देखील आग्रही असल्याने आमदार स्मिता वाघ यांनी अल्पसंख्यांक मंत्री ना. विनोद तावडे यांचेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अमळनेर व एरंडोल पालिकेस निधी मिळाला आहे. दरम्यान आमदार वाघ यांनी शहराकडे आता लक्ष केंद्रित केल्याने शहरात विकासाचा आलेख वाढण्याचे संकेत मिळत आहेत.