जळगाव। महानगर पालिकेतील जन्म-मृत्यू विभागातर्फे 10 दिवसापासून जन्म दाखला न देता एका आजोबांना फिरवाफिरव करण्यात येत होते. यात नगरसेवकांनी सूचना केल्यानंतर त्यांना गुरुवारी दाखला देण्यात आला आह सुरूच आहे. नागरिकांना वेळेवर आवश्यक असणारे दाखले न देणे, जन्मांचे नोंदी न सापडणे, दाखल दिलेच तर वेळेवर न देणे यासारख्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. यातच बंसलील पवार यांनी त्यांच्या नातूचा दाखला घेण्यासाठी 6 मार्च रोजी जन्म-मृत्यू विभागाची पावती फाडली होती. त्यांना 21 मार्चला दाखला मिळेल असे सांगण्यात आले.
सूचना केल्यावरही कर्मचार्यांचा कामचुकारपणा
त्यानुसार पवार हे 21 तारखेला दाखला घेण्यासाठी जन्म-मृत्यू विभागाच्या कार्यालयात गेले असतांना त्यांना दाखला न देता उडावाउडवीचे उत्तरे देण्यात आली. ते 21 मार्च पासून रोज महानगर पालिकेत चकरा मारत आहेत. परंतु त्यांना दाखला न देता कर्मचारी त्यांना दाखला अजून तयार नाही, उद्या या, कॉम्प्युटरमध्ये दाखला पाहून घ्या अशी उडवाउडवीचे उत्तरे देत होते. 21 तारखेला मिळणार दाखला 30 तारखेपर्यंत मिळाला नसल्याने त्रासून पवार यांनी त्यांच्या भागातील नगरसेवक अमर जैन यांना फोनद्वारे सर्व हकीगत सांगून मदत करण्याची विनंती केली. यावर नगरसेवक जैन यांनी कर्मचार्यांना फोनद्वारे दाखला देण्याची सूचना दिल्या. मात्र, नगरसेवकांचा फोन येवूनही कर्मचार्यांनी पवार यांना बसवून ठेवले व दाखला दिला नाही. यानंतर नगरसेवक जैन स्वतः पालिकेत हजर झाले व त्यांनी कर्मचार्यांना प्रत्यक्ष भेटून सूचना केल्यानंतर पाच मिनीटांत बंसीलाल पवार यांना दाखला देण्यात आला. यातून नागरिकांना नाहक त्रास दिला जात असल्याने जन्म-मृत्यू विभागातील कर्मचार्यांच्या भोंगळ कारभारबाबत नगरसेवक जैन यांनी नाराजी व्यक्त करत आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.