पिंपरी चिंचवड : महानगरपालिकेतील नगरसेवक व त्यांच्या कुटूंबियांसाठी करदात्या नागरिकांच्या पैशातून आरोग्य विमा काढण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे. हा ठराव सर्व साधारण सभेने रद्द करावा. अशा पध्दतीने विमा काढणे म्हणजे करदात्या जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा उद्योग आहे. जनतेच्या पैशावर नगरसेवकांचा विमा कशासाठी, या विमा उद्योगामुळे नेमके कोणाचे ‘आरोग्य’ सुधारणार आहे. असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा
सभेतील ठराव रद्द करा
यामध्ये म्हटले आहे की, प्रत्यक्षात नागरिकांचे सर्वांगिण आरोग्य सुदृढ ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नगरसेवकांच्या आरोग्याची एवढी काळजी प्रशासनाला असेल तर त्यांनी शहरातील सर्वच करदात्या नागरिकांचा आरोग्य विमा काढावा. अशी मागणी साठे यांनी केली आहे. नगरसेवक हे सेवेचे पद आहे. परंतू चहूबाजूंनी भ्रष्टाचारात गुरफटलेल्या प्रशासनाला व सत्ताधा-यांच्या हातचे बाहूले बनलेल्या आयुक्तांना पदाधिका-यांचे लांगूलचालन करण्यातच धन्यता वाटते. सर्व साधारण सभेने हा ठराव रद्द करावा अन्यथा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा तसेच वेळप्रसंगी न्यायालयात जावू.