जळगाव । गोलाणी मार्केटच्या अग्निशमन विभागाजवळ पार्किंग केलेल्या भुसावळ येथील भाजपचे नगरसेवक अमोल इंगळे यांच्या कारचे चोरट्यांनी 10 मार्च रोजी काच फोडून साडेतीन लाख रूपये चोरून नेले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील पथकाने हाड्या उर्फ विकास राजू गुमाने व टारझन उर्फ बल्लू अरूण दहेकर या दोघांना मंगळवारी दूपारी अटक केली. तसेच दोघांमध्ये पैशांवरून वाद होवून हाणामारीही झाल्याची माहिती चौकशी मिळाली आहे. चोरी केलेल्या पैशांची ऐश केल्याचेही त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले.
भुसावळ येथील भाजपचे नगरसेवक अमोल मनोहर इंगळे हे 10 मार्च रोजी सायंकाळी त्यांच्या खासगी कामानिमित्त गोलाणी मार्केटमध्ये आले होते. वाहन पार्किंगची समस्या असल्याने अग्निशमन कार्यालयाजवळ त्यांनी आपल्या मालकीची कार (एमएच 19, बीडी 4141) उभी पार्किंग केली होती. या कारच्या मागील सीटवर कापडी पिशवीत त्यांनी 3 लाख 50 हजार रुपये ठेवले होते. त्यांनी कारच्या काचा व्यवस्थित लावल्याची खात्रीही केली होती. मात्र, इंगळे हे गोलाणी मार्केटमध्ये गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कारच्या डाव्या बाजूला असलेल्या मागील सीटची काच फोडून पैसे घेऊन पोबारा केला. दरम्यान, अमोल इंगळे हे काम आटोपून कारजवळ परतल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी इंगळे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सहायक पोलिस निरीक्षक आशीष रोही, वासुदेव सोनवणे, संजय हिवरकर, विकास महजन, अक्रम शेख, गणेश शिरसाळे, इम्रान सय्यद, मोहसीन बिराजदार, सुधीर साळवे, संजय भालेराव यांना तपासासाठी पाठविले होते.
पैशांच्या वादातून सापडले चोरटे…
गोलाणी मार्केटच्या पार्किंगमधून 10 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास साडेतीन लाख रूपये असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर चोरटे पसार झाले. मात्र कारमधून बॅग उचलून पळणारा हाड्या उर्फ विकास राजू गुमाने याने त्याचा दुसरा साथीदार टारझन उर्फ बल्लू अरूण दहेकर याला बॅगमध्ये 1 लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी प्रत्येकी पन्नास हजार रुपये वाटून घेतले. दुसर्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांमध्ये साडेतीन लाख रुपये चोरल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे टारझन याने हाड्याला विचारले. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाली. तसेच गेल्या दोन दिवसांपासून दोघे चोरटे दारू पिऊन ऐश करीत असल्याची माहिती अक्रम शेख यांना मिळाली होती. त्यावरून मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास दोघांना अटक करण्यासाठी गेेले असता त्यांनी मागच्या दरवाजाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मागच्या दरवाजाजवळही सापळा लावलेला होता. त्यामुळे चोरटे पळून जाण्यास अपयशी ठरले.
लक्ष ठेऊन केली चोरी…
भुसावळ येथील भाजपचे नगरसेवक अमोल इंगळे यांनी 10 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पुष्पलता बेंडाळे चौकातून एकाजणाकडून व्यवहाराचे साडेतीन लाख रुपये घेतले. त्यावेळी हाड्या आणि टारझन यांनी पैसे घेताना पाहिले. त्यानंतर बेंडाळे चौकापासून दोघांनी इंगळे यांच्या कारचा मोटारसायकलने पाठलाग केला. इंगळे यांनी कार गोलाणी मार्केटमधील मागच्या बाजुला पार्क केल्यानंतर दोन्ही चोरट्यांचे काम सोपे झाले. त्यातील टारझन इंगळे यांच्याकडे तसेच आजुबाजुला लक्ष ठेवून होता. तर हाड्याने दगडाने कारचा काच फोडून पैसे ठेवलेली बॅग उचलून दोन्ही पसार झाले.