नगरसेवकाच्या बदनामीचे महासभेत तीव्र पडसाद

0

नगरसेवकांची बदनामी करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करा; सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ठेकेदारांना मस्ती आली आहे. त्यांची मस्ती जिरविण्याची गरज आहे. नगरसेवक खंडणी मागत आहेत, दादागिरी करतात असे चुकीचे आरोप ठेकेदार नगरसेवकांवर कसा करु शकतो. त्याला एवढा कसला माज आला आहे. ठेकेदाराला काही अधिकारी पाठिशी घालत आहेत. या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन त्या ठेकेदाराला पालिकेचे कायमस्वरुपी दरवाजे बंद करावेत, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत केली. भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी 50 हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याची तक्रार कोहली अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीचे चालक एकुमसिंग कोहली यांनी सांगवी पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच नगरसेवक कामठे यांच्याकडून आपल्याला व आपल्या कामागारांच्या जीवाला धोका असून. पोलिस संरक्षण देण्याची मागणीदेखील केली त्यांनी केली आहे. या तक्रारीचे पडसाद महासभेत उमटले.

भोईर, कलाटे यांची घणाघाती टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, नगरसेवकाने खंडणी मागितल्याची तक्रार ठेकेदार कसा करत आहे. नगरसेवकांची बदनामी केली जात आहे. ठेकेदाराला एवढा कसला माज आला आहे. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन शहानिशा, सखोल चौकशी करावी. या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे. या ठेकेदाराचे पालिकेतील कायमस्वरुपी दरवाजे बंद करावेत. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, अधिकारी ठेकेदाराला पाठिशी घालत आहेत. एका फलकाची परवानगी घेऊन 10 अनधिकृत फलक लावले जात आहेत. नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, मी माहिती अधिकारातून माहिती मागविली होती. ही माहिती देण्यास चालढकल केली जात होती. एक कागद देण्यास मला सहा महिने लावले. याबाबत अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. परंतु, त्यांनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केले. अधिकारी ठेकेदाराला पाठिशी घालत आहेत. माझा केवळ कोहली या एजन्सीला आक्षेप नाही. शहरातील अनधिकृत फलकाविरोधात माझी मोहिम आहे.

महापौरांनी दिले चौकशीचे आदेश
सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ठेकेदार नगरसेवकाला धमकी देतो. मुजोर आणि माजलेले ठेकेदार या पालिकेत आहेत. नगरसेवकांवर दादागिरी केली जाते. पैसे खातोय, असे चुकीचे आरोप केले जात आहेत. ठेकेदारांची मस्ती जिरविण्याची गरज आहे. कोहली या ठेकेदारावर कडक भूमिका घेण्यात यावी. त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. त्याला पालिकेतील एकही काम मिळाले नाही पाहिजे. त्याच्या मालमत्तेवर जप्ती आणावी. या ठेकेदाराला पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी. फलकांच्या माध्यमातून शहर बकाल होत आहे, असेही ते म्हणाले. महापौर नितीन काळजे यांनी या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा. ठेकेदाराला पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांची सखोल चौकशी करुन त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेश प्रशासनाला दिला.