प्रदेशाध्यक्ष दानवे, आमदार गोरे यांची उपस्थिती
आळंदीः काही दिवसांपूर्वीच आळंदी नगरपरिषदेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक स्व. बालाजी कांबळे यांची हत्या करण्यात आली होती. सुस्वभावी असलेल्या या नगरसेवकाच्या मृत्यूने आळंदी परिसरात शोककळा पसरली होती. ग्रामस्थ, सर्व पक्षीय नेते मंडळी, मित्र सर्वांनीच कांबळे या सर्वांनीच त्यांच्या मृत्यूमुळे दुःख व्यक्त केले होते. नुकतेच भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कांबळे यांच्या कुंटुंबियांची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार सुरेश गोरे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी नगरसेवक कांबळे कुटुंबियांचे सांत्वन करीत सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या सात वर्षीय मुलीने तसेच परिवाराने पालकमंत्री गिरीश बापट यांना आपल्या मनातील भावना व दुःख व्यक्त केले. ही घटना सांगून न्यायासाठी दाद मागितली. यावेळी पोलीस उपायुक्त गणेश गावडे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका स्मिता रायकर, सुनीता रंधवे, भाजपच्या महिला शहराध्यक्षा शैलजा मोळक, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, खेड भाजपचे अध्यक्ष अतुल देशमुख उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना दिले निवेदन
याप्रसंगी आळंदीतील नगरसेवक सचिन गिलबिले यांनी पालकमंत्री बापट यांना ‘शासन व भाजपकडून कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीचे निवेदन दिले. देहू फाटा चौकात पोलीस चौकीची मागणी करणारे निवेदनही पालकमंत्र्यांना देण्यात आले. तर नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर हल्ला करणार्या आरोपींमध्ये एक गुन्हेगार मावसभाऊ आहे. दरम्यान या प्रकरणी दिघी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन जण अल्पवयीन असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.