सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
पिंपरी-चिंचवड : शहरातील अनधिकृत पोस्टर्सविरुद्ध केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी एक जण कार्यालयात येवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार भाजपच्या नगरसेवकाने पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच धमकी देणारी व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्यामुळे या नगरसेवकाने पोलीस संरक्षणाची मागणी देखील केली आहे. सत्ताधारी भाजपचे पिंपळेनिलख, विशालनगर प्रभागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात एकुमसिंग कोहली (रा. दापोडी) याच्या विरोधात तक्रार दिली आहे.
धमकी देणारा गुंड
नगरसेवक कामठे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एकुमसिंग कोहली हा मला सातत्याने फोन करत आहे. तसेच शहरातील अनधिकृत पोस्टर्सविरुध्द केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रत्यक्ष आमच्या कार्यालयात येवून मला दमदाटी केली. त्याने अनेक वेळा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही त्याला सौजन्याने फोनवर बोलूनसुद्धा त्याचा उर्मटपाण थांबला नाही. अनधिकृत फलकांविरुद्ध आम्ही उचलले धोरण थांबविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत होता.
पोलिस संरक्षण मिळावे
एकुमसिंग हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे कामठे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याने मला पोलीस संरक्षण द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.