पिंपरी-चिंचवड : यमुनानगर पोलीस चौकीसमोरच एकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. मात्र तुषार हिंगेला अद्याप अटक झालेली नसून निगडी पोलिसांनी त्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. महेश गारोळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात 9 ओक्टोबर 2017 रोजी या प्रकरणी फिर्याद दिली होती. आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून तुषार हिंगे व त्याच्या साथीदारांनी गारोळे व त्यांच्या साथीदारांना मारहाण केली होती.
या प्रकरणात तुषार हिंगे व साथीदार रोहित गवारे, हेमंत भोसले, चंदनसिंग आणि संतोष साळुंखे, गोविंद सातपुते, रवींद्र तळेकर, विशाल बाबर आणि शिवराज चिखले यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याविषयी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुले म्हणाले की, अद्याप त्यांना आम्ही फरार घोषित केलेले नाही. त्यांच्यावर नियमानुसार आम्ही केवळ आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये तो आरोपी असल्याने शोध सुरु आहे. हिंगे व त्याच्या साथीदरांना आम्ही लवकरच पकडू, असेही पळसुले यांनी सांगितले आहे. अद्याप हिंगे याने अटकपूर्व जामीन घेतलेला नाही. यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली होती मात्र त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने ते सध्या जामिनावर आहेत तर तुषार हिंगेसह 11 जण फरार आहेत.