नगरसेवक दीपक मानकरांना पुन्हा धक्का

0

मुंबई : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील तिसऱ्या खंडपीठाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी बुधवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. याआधी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांनीही या याचिकेवर सुनावणी घेण्यास दिला नकार होता. त्यामुळे आता मानकरांना पुन्हा नव्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करावी लागेल.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दीपक मानकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. या पाच जणांमध्ये दीपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरु करताच मानकर यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे.