आजच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघात शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी
पिंपरी-चिंचवड : शहरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेत येथील नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आता चिंचवड विधानसभा मतदार संघातून लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. त्यामुळे तगड्या उमेदवाराच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यामुळे दिलासा मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी-चिंचवड महापालिकेत झालेल्या प्रचंड पराभवाचे उट्टे काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सज्ज झाली आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघातून तगड्या उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातून मोरेश्वर भोंडवे यांचे नाव चर्चेत आहे. भोंडवे शनिवारी (दि.2) यांचा वाढदिवस असून यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. ठिकठिकाणी शुभेच्छांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध पदांवर संधी
महापालिका वर्तुळात लक्ष्मी पुत्र अशी ओळख असलेल्या भोंडवे यांनी 2012मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. अपक्ष लढूनही विजयश्री खेचून आणत त्यांनी राष्ट्रवादीला ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना विविध पदांवर संधी देण्यात आली. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भोंडवे राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले. पहिल्याच वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना स्थायी समिती सदस्यपदाची संधी दिली. स्थायी समितीमध्ये भाजपचे मोठे बहुमत असताना भोंडवे यांनी चुकीच्या कामांना कडाडून विरोध केला. भाजपच्या एककल्ली कारभाराचा निषेध म्हणून स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेत सत्ताधार्यांना घाम फोडला होता. भोंडवे यांच्या पराभवासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांना पळता भुई थोडी झाली. आता भोंडवे यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरावे, असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. मोरेश्वर भोंडवे यांनी आपले मनसुबे अद्याप जाहीर केले नसले तरी त्यांच्या वाढदिवसाची तयारी पाहता विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. आगामी काळात काय काय घडामोडी होतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.