अहमदनगर : नगर – कल्याण रोडवर आळेफाटा जवळील गायमुखवाडी गावात स्कूलबस आणि पिकअपची धडक होऊन मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. डॉन बॉस्को शाळेची बस मुंबईच्या सहलीहूल नगरमध्ये परतताना समोरून येणा-या पीकअपशी धडक झाली. हा अपघात गुरूवारी रात्री १०:३० च्या सुमारास झाला. या अपघातात पीकअपचा चालक तर बसमधील एक मदतनीस आणि एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. यात काही विद्यार्थी जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांना आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शालेय सहलीसाठी ही बस गेली होती. या बसमध्ये ४७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. सहलीवरून परतताना या बसच्या समोरून येणा-या पिकअपशी जोरात धडक झाली. दोन्ही गाड्यांनी जागीच पेट घेतला. बसचा अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. पिकअपचा चालक महादेव आबाजी खोसे रा. पाडळी ता. पारनेर, शिक्षक अरूण जाधव आणि बसचा मदतनीस शैलेश निमसे या तिघांचा अपघातात मृत्यू झाला. जखमींमध्ये तीन शिक्षक आणि २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे .