पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अहमदनगरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला साथ दिल्याचे पडसाद सध्या उमटत असून पुण्यातही त्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काँग्रेस पक्षाचा १३३ वा वर्धापनदिन शुक्रवारी झाला. त्यानिमित्ताने काँग्रेस भवनात संध्याकाळी सर्वपक्षीय स्वागत समारंभ आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्यात सहभागी झाले होते. उपस्थितांच्या गप्पांमध्ये नगरमधील घडामोडींची चर्चा होती. हा प्रश्न स्थानिक आहे. आमच्या पक्षाने संबंधितांना नोटीसा पाठवल्या आहेत अशाप्रकारे पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षातील उपस्थितांनी केला. नगरमध्ये सग्यासोयऱ्यांचे राजकारण चालते. त्यातून हा प्रकार घडला आहे अशी सारवासारवही राष्ट्रवादीच्या उपस्थितांनी केली परंतु काँग्रेसच्या मंडळींचे समाधान झालेले दिसले नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधकांची आघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून मनापासून चालू आहे. राहुल गांधींनी कधीही ताठर भूमिका घेतली नाही. जनमानसही मोदी सरकारच्या विरोधात व्यक्त होताना दिसत आहे. अशा वेळी उत्तर महाराष्ट्रातील नगर सारखे शहर राष्ट्रवादीने भाजपच्या स्वाधीन केले त्यातून भाजपचेच हात बळकट झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐनवेळी कोणती भूमिका घेईल अशा शंका या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १८ नगरसेवक फुटतात आणि भाजपला पाठिंबा देतात ही बाब पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजीत पवार यांच्यापासून लपून राहिली होती यावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास नाही. पक्षातील बारीकसारीक घडामोडींवर माझं लक्ष असते असे विधान शरद पवार यांनी केले होते त्याची आठवण काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने करुन दिली.
पुणे शहर लोकसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. पण, आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात त्यामुळे पुण्यात तरी मनोमिलन झालेले नाही. नगरमधील घटनेमुळे त्यात अजूनच भर पडली आहे.
हे देखील वाचा