पुणे । नगर रस्त्यावरील येरवडा पर्णकुटी चौक ते जुना जकात नाका यादरम्यान होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या दालनात बैठकीत घेण्यात अली. यामध्ये नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना करून 15 दिवसांत ही वाहतूककोंडी सोडवणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. या बैठकीला वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, याभागातील सर्व नगरसेवक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
खासगी बसचे पिकअप पॉइंट बंद
या रस्त्यावर असलेले खासगी बसचे पिकअप पॉइंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पर्णकुटी चौक ते जुना जकात नाका (खराडीपर्यंत) खासगी बसला या रस्त्यावर प्रवासी घेता येणार नाही. त्यामुळे या कंपन्यांना प्रवास सुरू होतो, त्या ठिकाणीच (संगमवाडी) येथेच प्रवासी घ्यावे लागणार आहेत. या शिवाय, या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत जड वाहनांना बंदी असणार आहे. तसेच या मार्गावर बीआरटी सुरू झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेले बसथांबे काढून घेणे अपेक्षित होते. मात्र, ते अजून काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाशी चर्चा करून पुढील 15 दिवसांत हे थांबे काढण्यात येणार आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले थांबे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटीचे बसस्थानक 100 मीटरमध्ये हलवणार
महापालिकेच्या वतीने करण्यात आलेला बीआरटी मार्गामध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्या दुरूस्त करण्यात येतील. यासंदर्भात वाहतूक विभागाचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. या रस्त्यावरील चौकांमधील वाहतूक आर्यलँड कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील बीआरटी प्रकल्प झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेले बसस्थानके काढून टाकणे अपेक्षित होते. अद्याप ही स्थानके काढण्यात आली नाहीत. त्यामुळे ही स्थानके काढण्याच्या सूचना पीएमपीएलला देण्यात आल्या आहेत. खराडी येथील एसटीचे बसस्थानक 100 मीटर आतमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या उपाययोजना केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असे धेंडे यांनी सांगितले.
मजूर अड्डाचे स्थलांतर
याशिवाय येरवडा चौकात असलेला मजूर अड्डा या ठिकाणाहून स्थलांतरित करून तो पर्णकुटी पोलीस चौकीच्या बाजूस असलेल्या महापालिकेच्या जागेत स्थलांतरित करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.