धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; आरोपी पसार
धुळे- तालुक्यातील नगाव बुद्रुक शिवारातील एका शेतात भांग लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत जमिनीत लपवलेला नऊ लाख 20 हजार 800 रुपये किंमतीच्या 180 कोरड्या भांगाच्या जप्त केल्या़ याप्रकरणी दोघांविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कोरडा भांग एका शेतजमिनीत तळघर करुन त्यात लपवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नगाव बुद्रुक शिवारातील राजेंद्र नारायण राणा (दाळवाले) यांच्या साडेचार एकर बीन शेतजमिनीत मयूर नारायण राणा याने या शेतात जमिनीत 8 फूट खोल सिमेंटच्या ओतीव भिंतीच्या खाली तळ घरात भांग लपवला होता. पोलिसांना या ठिकाणी 180 कोरड्या भांगच्या गोण्या आढळल्या तर त्यात सुमारे चार हजार 604 किलो भांग आढळला. घटनास्थळावरून दोन लाखांच्या दोन कार मिळून एकूण 11 लाख 20 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राजेंद्र नारायण राणा (दाळवाले) आणि मयूर नारायण राणा (दाळवाले) या दोघांविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, नथ्थू भामरे, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मनोज बागुल, श्रीशेल जाधव, केतन पाटील, दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ यातील मयूर राणा याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा संशयीत आरोपी पसार झाला आहे.