धुळे । शहरातील नटराज टॉकीज जवळ आज भल्या पहाटे अचानक लागलेल्या आगीत एक घर आणि भंगार गोदाम जळून खाक झाले. या आगीच्या घटनेने परिसरात पहाटेच्या वेळी मोठी खळबळ उडाली. दोन्ही घरांचे मिळून सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. शहरातील ऐंशी फुटी रोडवरील नटराज टॉकीज जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात पत्री शेड व लाकडी फळ्यांच्या साहाय्याने घरे व भंगार गोदामे बांधण्यात आली आहेत. याठिकाणी राहणार्या संतोष मल्हारी सोनवणे व त्यांच्या घराशेजारी राहणार्या खलील अहेम्मद अनीस अहेम्मद यांच्या मालकीचे घर वजा भंगार गोडाऊन असून आज दि.20 रोजी भल्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास अचानक या घरांना आग लागली.
आगीत अंदाजे दोन लाखांचे नुकसान
लाकडी साहित्य व भंगार साहित्य यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. संतोष सोनवणे यांच्या घरातील लोकांनी वेळीच बाहेर धाव घेतली व आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे व परिसरातील लोक जागे झाले व आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. घटनेची माहिती मनपाच्या अग्निशामक दलास देण्यात आली. मात्र पाण्याचे बंब उशीरा आल्याने आगीत संतोष सोनवणे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळाले तर खलील अहेम्मद यांच्या गोडाऊन मधील भंगार साहित्य व लाकूड जळून खाक झाले. संतोष सोनवणे यांनी 40 हजार रूपयांचे तर खलील अहेम्मद यांनी दिड लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.