नथुराम गोडसेंच्या पुतळ्याची चौकशी करणार

0

मुंबई – कल्याणपासून पाच किमी अंतरावरील सापर्डे गावात उभारण्यात येणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या पुतळयाची सरकारकडून चौकशी करण्यात येणार असल्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी रविवारी विधान परिषदेत दिली.

काँग्रेसचे संजय दत्त यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे हा विषय उपस्थित केला होता. हिंदू महासभेच्या वतीने एका खाजगी जागेवर नथुराम गोडसे यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. यासाठी राज्यस्थानहून गोडसे यांची मूर्ती आणण्यात येणार आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हा कलंक असल्याची भावना दत्त यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले म्हणाले की, खासगी जागेत हा पुतळा उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी सशस्त्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सशस्त्र शिक्षणाचा उपक्रम हा कशाचा भाग आहे, असा सवाल त्यांनी केला. पुरोगामी महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्त्येचा तपास लागत नाही. अशा प्रकारचे खून वारंवार घडत राहवे याचे प्रशिक्षण देणारी संस्था नथुराम गोडसेंच्या नावाने महाराष्ट्रात काढतात, असेही ते म्हणाले. कुठल्याही महापुरूषाचा पुतळा उभा करण्यासाठी परवानग्यांची भली मोठी यादी आहे. गोडसेंच्या पुतळयाशी सरकारचा संबध नाही. त्याला कोणीही परवानगी दिलेली नाही. तरीही या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.