नदीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

0

शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरूर) येथील स्मशानभूमिजवळ वेळ नदीच्या बंधार्‍यामध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून त्या पुरुषाबाबत काहीही माहिती मिळाली नसल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी शिक्रापूर येथील आठवडे बाजार असल्याने अनेक नागरिक त्या ठिकाणी आलेले होते. त्यावेळी काही नागरिकांना पाण्यामध्ये एका इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले.

त्यांनतर शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी त्या ठिकाणी जात पंचनामा केला असता वेळनदीच्या पाण्यामध्ये अंदाजे पंचवीस ते तीस वर्षे वयोगटातील पुरुष जातीचा इसम, त्याच्या अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची नाईट पँट, तर उजव्या पायामध्ये सँडल, केस काळे असे आढळून आले. त्या पुरुषाबाबत आजूबाजूला चौकशी केली असता काहीही माहिती मिळू शकली नाही. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. तर सदर इसम हा नदीच्या पात्रात बुडून मयत होऊन येथे वाहत आला असावा असा अंदाज शिक्रापूर पोलिसांनी वर्तविला आहे. तर या इसमा बाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी 02137286333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे हे करत आहे.