पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणार्या पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांचा त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेतेन नदीपात्रातील जलपर्णी त्वरित काढावी, या मागणीसाठी मनसेने बुधवारी (दि.8) पालिका मुख्यालयात आंदोलन केले. पालिका मुख्यालयातील दुसर्या मजल्यावर असलेल्या आरोग्य विभागासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जलपणी काढण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. इंद्रायणी, पवनात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे नद्यांना गटारगंगेचे स्वरुप आले आहे. ठेकेदाराकडून वेळेवर जलपर्णी काढली जात नाही. पाऊस पडून जलपर्णी वाहून गेल्यानंतर काढण्याचे नाटक केले जाते. त्यानंतर पालिका देखील ठेकेदाराला बिल अदा करते असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच वेळेवर काम न करणार्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील त्यांनी केली.