यावल । तालुक्यातील अंजाळे शिवारात तापी नदी पात्रात काही लोक स्फोटके लावून ब्लास्टिंग करीत असल्याने परिसरातील घरांना तडा पडत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अंजाळे येथील ग्रामस्थांतर्फे तहसिलदारांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. परिसरात असलेल्या तापी नदी पात्रात उत्खननासाठी ब्लास्टींगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे या स्फोटकांचा परिसरातील घरांना हादरा बसून तडा जात आहे. तसेच लहान मुलांच्या आरोग्यावरदेखील याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे याठिकाणी होत असलेली ब्लास्टींग बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.