नदी स्वच्छतेच्या प्रतिज्ञेने पवनामाई उत्सवाची सांगता

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – जलप्रदूषण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पवनामाई जलमैत्री अभियान राबविण्यात आले. बुधवारी मावळातील पवनानगर येथे पवना नदीतून प्रारंभ झालेल्या जलदिडींची गुरूवारी सायंकाळी साडेसातला मोरया गोसावी मंदिराच्या घाटावर नदी स्वच्छतेच्या प्रतिज्ञेने सांगता करण्यात आली. नदीला माता मानून जलपूजन करण्याच्या संकल्पनेतून ग्राम प्रबोधिनीचे प्राचार्य व्यंकटेश भदाने यांनी 16 वर्षांपूर्वी पवनामाई महोत्सवाला सुरुवात केली. तेथून प्रेरणा घेत जलदिंडी प्रथेला सुरुवात करण्यात आली. जलदिंडीचे हे नववे वर्ष आहे.

शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
या अभियानात दोन बोटीमधून 65 ते 70 किमी अंतर नदीतून प्रवास करण्यात आला. ज्यामध्ये मावळ व पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधीवर पवनेच्या उगमातील जलाचा अभिषेक करुन उपस्थितांनी नदी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा हेमंत गावंडे, आनंद देशमुख, अभिषेक वाल्हेकर यांनी उपस्थितांकडून म्हणून घेतली. तर या प्रतिज्ञेला महेश नंदे काका यांनी मार्गदर्शन केले.

जनजागृतीसाठी काढली फेरी
यावेळी दुपारी तीन वाजता नदी घाटावर नदी स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी उपस्थित विद्यार्थ्यांची एक रॅली देखील काढण्यात आली. सांगता कार्यक्रमात पीसीसीएफचे धनंजय शेडबाळे यांनी जलदिंडीचे स्वरुप व हेतू समजावून सांगितला. मसुडगे यांनी पवना नदी पात्रातील जलपर्णीमुक्त अभियानाची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनीही नदी व तिच्या स्वच्छतेबाबत आपली मते मांडली.

यांची होती उपस्थिती
जलदिंडी सांगता कार्यक्रमास माजी नगरसेवक मारुती भापकर, भावसार व्हिजनचे राजीव भावसार, शेखर चिंचवडे फाऊंडेशनचे सचिन काळभोर, संदीप वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, सोमनाथ हपरपुडे, हेमंत गावंडे, डॉ. राजीव नगरकर, आनंद देशमुख, अभिषेक वाल्हेकर, तुषार वाल्हेकर, शहाजी पाटील, सिद्धेश्‍वर चिले, श्रीराम लोमटे, रानजाई प्रकल्पाचे सोमनाथ आबा मसुडगे, अंघोळीची गोळीचे प्रवर्तक माधव पाटील, पीसीसीएफचे सदस्य, महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, धनंजय शेडबाळे, चिंतामणी सोंडकर, पवनानदी स्वच्छतेची प्रतिज्ञा लिहिणार्‍या अंजू घाडगे आदी उपस्थित होते. प्रवीण लडकत यांनी आभार मानले.