पुणे । पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्षपदावरून दहा महिन्यातच तुकाराम मुंढे यांची अचानक बदली झाल्यानंतर सोमवारी नयना गुंडे यांनी कार्यभार स्वीकारला. त्या पीएमपीच्या पहिल्या महिला अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक ठरल्या आहेत. यापूर्वी गुंडे या वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. शहरातील भाजप पदाधिकार्यांनी मुंडे हटाव मोहीम तीव्र केल्यानंतर मागील आठवड्यातच मुंढे यांची राज्य शासनाने नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली केली होती.
मुंढेचे निर्णय बदलणार का?
नयना गुंडे यांनी सोमवारी दुपारी पीएमपीची सूत्रे हाती घेतली. सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गुंडे यांनी अधिकार्यांकडून कामकाजाविषयी माहिती घेतली. प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यानंतर मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय बदलण्यासाठी दबाव येऊ शकतो. हे निर्णय त्या बदलतात का? यावरून त्यांच्या कामाची पद्धत पुणेकरांना दिसून येणार आहे. तसचे पीएमपीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच आराखडा तयार झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान गुंडे यांच्यासमोर असून विविध आघाड्यांवर त्यांना काम करावे लागणार आहे.
शिस्त कायम राहणार का?
आता नयना गुंडे यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंढे यांनी सुरूवातीपासूनच अधिकारी व कर्मचार्यांवर शिस्तीचा बडगा उगारला होता. गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी शेकडो कर्मचार्यांना सेवामुक्त केले. तसेच शेकडो कर्मचार्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकार्यांसह कामगार संघटनांनी मुंढे यांच्या बदलीसाठी मोर्चा उघडला होता. तसेच मुंढे यांच्या काही निर्णयांवर प्रवासी संघटनाही नाराज होत्या. मुंढे यांच्याकडून पुणेकरांना अपेक्षा होत्या. त्यानुसार त्यांनी कामाला सुरूवातही केली होती. मात्र, त्यांना केवळ दहा महिन्यांचा कालावधी मिळाला. नयना गुंडे पीएमपीला मुंढेंनी लावलेली शिस्त कायम ठेवणार की, शिथिल करणार हेदेखील पहावे लागणार आहे.