नरबळीच्या संशयावरुन तिघांना चौकशीसाठी घेतले ताब्यात

0

मुक्ताईनगर/बोदवड । नरबळीच्या संशयावरून तालुक्यातील माळेगाव येथील आदेशबाबांच्या हिंगोणा शिवारात असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात हत्त्यारे, पुजेचे साहित्य नोटा, नोटांच्या आकाराचे कागदांचे बंडल, कवटी असे साहित्य आढळून आल्याने पोलिसांनी आदेशबाबांसह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिस बालशौर्य पुरस्कारप्राप्त निलेश भिल्लच्या शोधात गेले असता या बाबाला अटक
करण्यात आली.

मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त निलेश भिल्ल व त्याचा लहानभाऊ गणपत यांचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल आहे. यांचा शोध सुरू असतांना मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील आदेशबाबा उर्फ भिवसन सखाराम गोपाळ (महाजन) याच्यावर काही वर्षापूवी नरबळीचा गुन्हा दाखल होता. त्या संशयावरून मुक्ताईनगर व बोदवड पोलिसांनी हिंगोणा शिवारातील आदेशबाबाच्या घरावर रात्री 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता नोटांचा पाऊस पाडण्याची विधी व पुजा साहित्य मांडलेले दिसून आले. त्या ठिकाणी काही नोटा व नोटांसारखी कागदांची कोरे बंडले सुद्धा आढळून आली. घराची झडती घेतली असता तलवार, एक सुरा, कोयता, लोखंडी सळ्या, कवटी, पुजेचे साहित्य, 500, 100 व 10 च्या नोटा, कोरे कागदांची बंडले ताब्यात घेतले आहे.

साडेचार ते पाच लाखांच्या जवळपास रक्कम व मुद्देमाल आढळून आल्याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. या कारवाई पो.नि.अशोक कलगड, एपीआय हेमंत कडूकार, पोउनि वंदना सोनुने, बोदवडचे पो.नि.बनकर व तेथील पोलिस पथक सहभागी होते. याप्रकरणी आदेशभाबाब उर्फ भिवसन सखाराम गोपाळ (महाजन) यांच्यासह शिरपूर येथील अजय बैसाणे, सागर सोनवणे, कैलास शिरसाठ या तिघांना ताब्यात घेतले आहे. बालशौर्य पुरस्कारप्राप्त निलेश भिल्ल लापता असल्याने पंतप्रधान कार्यालयातून विचारणा करण्यात येत आहे. मात्र नेमका धागा सापडत नसल्याने तपास कार्यात अडथळे निर्माण होत आहे. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.