नरेंद्र मोदी, डॉ. आंबेडकर ब्राह्मण

0

गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी बरळले
राम, कृष्णाला ब्राह्मणांनीच दिले देवत्व

गांधीनगर : श्रीराम क्षत्रिय तर भगवान कृष्ण ओबीसी होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संविधानकर्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे ब्राह्मण आहेत, असे वादग्रस्त विधान गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी केले आहे. शनिवारी गांधीनगर येथे ब्राह्मण बिजनेस समिटमध्ये ते बोलत होते. विधान सभेच्या अध्यक्षांनी असे जातिवाचक विधान केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

देवत्वही ब्राह्मणांनी बहाल केले
त्रिवेदी म्हणाले, ब्राह्मण समाज कधीही सत्तेचा भुकेला नव्हता. उलट त्यांनी कित्येक राजांना त्यांच्या यशामध्ये योगदान दिले आहे. चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि भगवान कृष्ण यांच्या यशातही ब्राह्मणांचेच योगदान होते. ब्राह्मणांनीच देवांना बनवले आहे. श्रीराम हे क्षत्रिय होते मात्र, त्यांना देव बनवण्यामागे ब्राह्मण ऋषी, मुनींचे योगदान होते. तसेच कृष्ण ओबीसी होते त्यांना देव बनवण्यामागे ब्राह्मण सांदिपनी ऋषींचे योगदान होते. ब्राह्मणांनी संस्कृती भाषेचे रक्षण केले असून मत्सकन्येचे पुत्र भगवान व्यासांना देखील ब्राह्मणांनीच देव बनवले.

सर्व शिक्षित लोक हे ब्राह्मणच
ब्राह्मणांचे महत्व विशद करताना त्रिवेदी म्हणाले, जो कोणी शिकतो तो ब्राह्मणच असतो. त्यामुळे मला हे म्हणणे चुकीचे वाटत नाही की, आंबेडकर हे देखील ब्राह्मणच होते. आंबेडकर त्यांच्या आडनावामुळे ब्राह्मण आहेत. ज्या शिक्षकांनी त्यांना हे नाव दिले ते ब्राह्मण होते. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की सर्व शिक्षित लोक हे ब्राह्मणच असतात. याच संदर्भाने आदरणीय मोदीजी हे देखील ब्राह्मणच आहेत, हे सांगायला मला अभिमान वाटतो. त्रिवेदी यांनी ज्या ब्राह्मण बिजनेस समिटमध्ये आपली भुमिका मांडली या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील उपस्थित होते.