यवतमाळ । यवतमाळ जिल्ह्यातील कर्जाने पिचलेल्या शेतकर्यांनी आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना 2 लाख पत्र पाठविण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेष बाब अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकर्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार या पत्रांमधून करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना 14 एप्रिल रोजी पहिले पत्र लिहिण्यात आले आहे.
आत्महत्या केलेले यवतमाळचे शेतकरी शंकर चायरे यांची कन्या जयश्री चायरे यांनी हे पत्र लिहिले आहे. शंकर चायरे यांनी राजूरवाडी येथे विष पिऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चायरे कुटुंबीयांची भेट घेण्यास नकार दर्शविला. यामुुळेच आम्ही पत्र लिहिण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच राष्ट्रपती आणि राज्यपालांचे लक्ष वेधण्यासाठी पत्र लिहिण्यात येत आहे. मोदी आणि फडणवीस यांचा शेतकर्यांबाबतचा असंवेदनशीलपणाही या पत्रांतून राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्याचा हेतू असल्याचे काँग्रेस नेते आणि शेतकरी न्याय हक्क समितीचे प्रमुख देवानंद पवार यांनी यांनी स्पष्ट केले.