लालमाती प्रादेशिक वनहद्दीतील घटना ; वनविभागाचे प्रयत्न असफल
रावेर- तालुक्यातील पालजवळील लालमाती राखीव वनहद्दीतील नर्सरीत शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वणवा पेटल्याने वनहद्दीतील सुमारे 15 एकर क्षेत्रातील मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली. 20 रोजी लालमाती वनहद्दीतील कंपार्ट क्रमांक 16 मध्ये काम आटोपून अडीच वाजता विश्रांतीसाठी वनाधिकारी कर्मचारी घरी गेले असता अचानक नर्सरीमध्ये वणवा पेटला.
दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
आगीचे वृत्त कळताच वनपाल भदाणे व वनरक्षक सूर्यवंशी यांनी तत्काळ पाल मोरव्हाल, लोहारा, लालमाती येथील वनमजुर व ग्रामस्थांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. राखीव नर्सरी असल्याने कोरडा घास व कोरडा पाला-पाचोळामुळे आगीने रौद्र रूप धारणे. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रणरणत्या उन्हासोबतच वाढत्या तापमानामुळे आग अधिकच भडकल्याने जवळपास सत्तर टक्के नर्सरी जळून खाक झाली. गेल्यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी रुक्ष लागवड अभियानात या नर्सरीमध्ये रोप लावण्यात आले होते ते मात्र जळून खाक झाले.
वणवा विझवण्यासाठी यांचे प्रयत्न
वनपाल भदाणे, वनरक्षक सुर्यवंशी, वनमजुर जगन पवार, न्याजुद्दीन तडवी, दगडू तडवी, उखर्डू तडवी, ईस्माईल तडवी, फिरोज तडवी व पाल लोहारा, लालमाती वनमजुरांनी प्रयत्न केले.
आगीच्या नेमक्या कारणांचा शोध
नर्सरीला वणवा लागला याचे वृत्त आम्हाला कळताच आम्ही वरीष्ठांच्या कळूउन तात्काळ जवळ असलेल्या वनमजुराना पाचारण करण्यात आले. आम्ही 20 मिनिटात तेथे पोहोचल्यानंतर हिरवा पाला व पाण्याच्या साह्याने आग विझवण्यात आली. ज्यानेही हा वणवा लावला असेल त्याचा तपास वनविभाग करत आहे. तपास लागताच त्या दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे लालमाती वनपाल भदाणे म्हणाले.