नर्सरी, केजीतून शाळांची कोट्यवधींची लूट

0

मुंबई : इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश नामांकित शाळा आपल्याच शाळेतील नर्सरी/केजीच्या विद्यार्थ्यांना पाहिलीत प्रवेश देऊन प्रवेश पूर्ण करीत आहेत. त्यामुळे अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनाही नाईलाजाने आपल्या मुलांना या शाळांना नर्सरी/केजीत दाखल करावे लागत आहे. या शाळा अनुदानप्राप्त असल्यामुळे पहिलीतील प्रवेशासाठी नाममात्र शुल्क घेत असल्या तरी नर्सरी/केजीच्या प्रवेशासाठी दोन ते तीन वर्षाकरिता जवळपास लाखभर रुपये उकळत आहेत.

नर्सरी/केजीचे वर्ग बेकायदा
या शाळांना वर्षाकाठी करोडो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अन सर्वसामान्य मुलांना पाहिलीत प्रवेश नाकारला जात आहे. सत्य सामाजिक संस्थेने हा करोडोंचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. मात्र या शाळांनी चालवलेले नर्सरी/केजीचे वर्ग कायदेशीर की बेकायदेशीर या पेचात शिक्षण विभाग सापडला आहे.

पालकवर्गाची केली जाते कोंडी
सत्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नफिस खान आणि सचिव नाना सामंत यांनी सांगितले की, या शाळांना अशा तर्हेसने पूर्व प्राथमिक वर्ग चालवण्याची कोणतीही परवानगी मुंबई महानगरपालिका किंवा राज्याच्या शिक्षण विभागाने दिलेले नाही. या शाळा म्हणतात की आम्ही आमच्या अखत्यारीत हे वर्ग चालवितो असे असेल तर या शाळांनी इयत्ता पहिली करीता स्वतंत्रपणे बाहेरच्या मुलांना प्रवेश दिले पाहिजेत त्यासाठी त्यांना सरकार तर्फे अनुदान दिले जात आहे. मात्र या शाळा आपल्याच नर्सरी/केजीच्या विद्यार्थ्यांना पाहिलीत प्रवेश देऊन इतर सर्वसामान्य मुलांचा अधिकार नाकारत आहेत.