नळ जोडणीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट

0

वरणगाव : नगरपालिकेच्या निर्मितीपासून शहराची विकासाकडे वाटचाल सुरू असून रस्त्यांना अग्रणी महत्व दिले जात आहे. प्रामुख्याने जुने गाव, नवीन वस्त्या आदी भागामध्ये पालिकेच्या माध्यमातून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र या रस्त्यांच्या मध्यभागी पूर्वीपासून जलवाहिन्या अंथरल्या असून त्या आता अडचण ठरु पाहत आहे. रस्त्यातील रुंदीकरण करीत असता जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह कडेला करीत असतांना नागरिकांचे नळ कनेक्शन तुटत असल्याने पालिकेचे कर्मचारी या नळ कनेक्शनचा आर्थिक भार पाडत असून नागरीकांकडून पालिकेच्या कामाकरीता आर्थिक लुट केली जात असल्याचा आरोप होत आहे. याकडे पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे पाणीपुरवठा सभापती बबलू माळी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

150 ते 250 नळ कनेक्शनला गळती
शहरात पालिकेच्या सुरुवातीपासून रस्त्यांच्या स्वरूपात विकास कामाचा धडाका सुरू झाला असून जिकडे तिकडे पालिकेच्या माध्यमातून काँक्रीटीकरण रस्ता, डांबरीकरण रस्ता, खडीकरण करुन सर्व रस्ते रुंद केले जात आहे. मात्र रस्त्यांचे रुंदीकरण होत असलेल्या रस्त्याखाली तत्कालीन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व गांवात पाणीपुरवठा कामी जलवाहिन्या अंथरण्यात आलेल्या आहे. मात्र त्या जलवाहिन्या आज रोजी नागरीकांची डोकेदुखी ठरत आहे. शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या रस्त्याचे रुंदीकरणात पालिकेचे पाणी पुरवठयाचे व्हॉलकडेला करण्याचे काम सुरू आहे तर या व्हॉल्व्हवरील नळ कनेक्शन तोडले जात आहे आणि मुख्य रस्त्यावरील डांबरीकरणाच्या कामात दोनशे ते अडीचशे नागरीकांचे नळ कनेक्शनला रोलर दबाईमुळे गळत्या लागल्या आहे. यासंबंधी नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संर्पक साधला असता त्यांनी पालिकेकडे तक्रार करावी.

नागरिकांना आर्थिक भुर्दंड
पालिकेच्या कर्मचार्‍यांनी खोदकाम करून प्रत्येकी नळ कनेक्शनला लागणारे साहित्य 50 रुपयांपासून ते एक हजार रुपये घेवून काम करीत आहे. मात्र हा सर्व खर्च पालिकेच्या खात्यावर टिपला जात असल्याची चर्चा आहे. नागरिकांना वसुलीसाठी कर्मचारी वेठीस धरत असल्याचे बोलले जात आहे. विकासकामे करणे ही पालिकेचे कामे आहेत तर नागरीकांना भुर्दंड का? असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहे. या गंभीर परिस्थितीकडे पालिका प्रशासन व पालिका सभापती लक्ष देतील का? अशा कर्मचार्‍यांवर योग्य कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा नागरीक करीत आहे.