जळगाव । एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकर नगरात रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नवजात बालकाचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. अर्भकाची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक जिल्हा रूग्णालया दाखल केले. यातच मृत स्वरूप आढळुन आलेले अर्भकाच्या कुटूंबियांचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर नगर येथे रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एका कुत्र्याच्या तोंडात पुरूष जातीचे नवजात बालकाचे अर्भक दिसून आल्यानंतर तेथील रहिवाश्यांनी अर्भक कुत्र्याच्या तोंडातून सोडविले. यानंतर याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अर्भक सापडल्याची माहित दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपपोलिस निरिक्षक निलेश सोळंखे, पोलिस कर्मचारी संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा घेत चौकशी केली. यानंतर अर्भक जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टराच्या खिशातून मोबाईल लांबविला
जळगाव- कुटूंबियांना भेटण्यासाठी धुळे येथे जात असलेल्या डॉक्टरांच्या खिशातून अठरा हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. ही घटना नवीन बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी डॉक्टराने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मधुकर शिवदास पवार (वय-60) हे डॉ. उल्हास पाटील मेडीकल हॉस्पीटल येथे मेडीकल डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. तर हॉस्पीटलच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास आहे. परंतू, कुटूंबिय धुळे येथे वास्तव्यास असल्याने डॉ. पवार हे शनिवारी सायंकाळी नवीन बसस्थानकावर धुळे जाण्यासाठी आले होते. फलाटावर उभी असलेली विनाथांबा जळगाव-धुळे बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पँन्टच्या उजव्या खिशातून 17 हजार 990 रूपयांचा त्यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरून नेला. बसमध्ये बसल्यानंतर पवार यांना खिशातील मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याबाबत तक्रार दाखल केली. अखेर आज पुन्हा संपूर्ण कागपत्र दिल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फूस लावून पळविल्या- प्रकरणी एक ताब्यात
जळगाव- मामाच्या गावात राहत असलेल्या मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासातून रविवारी संशयित युवकास पारोळा येथुन ताब्यात घेतले. राकेश पारधी (20) रा.भोणे (धरणगाव) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेस त्याने फूस लावून पळवून नेले होते. फिर्यादीवरून याप्रकरणी भादंवि 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, नीलेश पाटील या कर्मचार्यांनी शोध मोहीम राबवून राकेश यास पारोळा येथून ताब्यात घेतले. आज सायंकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.