स्वच्छता पंधरवडा : रेल्वे अधिकार्यांनी स्वच्छतेबाबत प्रवाशांशी साधला संवाद
भुसावळ- भुसावळ विभागीय मंडळात सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्यांतर्गत गुरुवारी व शुक्रवारी नवजीवन एक्स्प्रेससह सचखंड एक्स्प्रेसची अधिकार्यांनी पाहणी करून स्वच्छतेबाबत सर्वेक्षण केले तसेच रेल्वे प्रवाशांशी संवादही साधून त्यांचे विचारही ऐकून घेतले. या शिवाय अन्य अधिकार्यांनी वेगवेगळ्या गाड्यांमधील स्वच्छतेची पाहणी केली भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे रुग्णालयाचे मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.जॉर्ज थॉमस यांनी नवजीवन एक्स्प्रेसचे निरीक्षण केले तसेच वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा व डॉ.श्रवण कुमार यांनी सचखंड एक्स्प्रेसची पाहणी करून स्वच्छतेचे निरीक्षण केले.
विविध रेल्वे गाड्यांची अधिकार्यांकडून तपासणी
भुसावळ डीआरएम कार्यालयातील विविध वरीष्ठ अधिकार्यांकडून पवन, हावडा, गीतांजली, शालिमार, पुरी-ओखा, पुष्पक आदी रेल्वे गाड्यांमध्ये जावून स्वच्छतेबाबत तपासणी करण्यात आली. अमरावती कोचिंग डेपोत अमरावती-मुंबई तर मनमाड डेपोत गोदावरी एक्स्प्रेसची स्वच्छता करण्यात आली.
चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वच्छता पंधरवड्याचे औचित्य साधून ऑफिसर कॉलनीतील ताप्ती क्लबमध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व पोस्टर रंगवा स्पर्धा घेण्यात आली. रेल्वे विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत आहे. रेल्वे प्रवाशांनी स्थानक तसेच रेल्वेत प्रवास करताना स्वच्छता बाळगावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.