नवरा मारतो; चालतय की! 49 टक्के महिलांचे कौटुंबिक हिंसाचारास समर्थन

0

मुंबई : प्रतिनिधी – बायको ऐकत नाही म्हणून वाजवली एक कानशीलात नवर्‍याने तर त्यात वावगं काय? असे मत महाराष्ट्रातल्या हजारो विवाहित महिलांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणात महाराष्ट्रातल्या 49 टक्के महिलांनी कौटुंबिक हिंसेचे समर्थन केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरी भागातील स्त्रीया अन्याय, अत्याचाराविरूद्ध उघडपणे बोलत असताना राज्यातील तब्बल निम्म्या महिलांनी कौटुंबिक हिंसेचे समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

फक्त 9 टक्के महिलांनी आवाज उठविला
एकूण 4,658 महिलांचे राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले, त्यापैकी 2,266 महिलांना नवर्‍याने केलेली मारहाण हा जाच वाटत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सासु-सासरे वा अन्य कुटुंबीयांचा आदर केला नाही, स्वत:ची कर्तव्ये बजावली नाहीत, घरातली कामे केली नाहीत, मुलांकडे लक्ष दिले नाही किंवा शारीरिक संबंधांना नकार दिला तर नवरा मारणारच, असे म्हणत या महिलांना कौटुंबिक हिंसेचे समर्थन केले आहे. घरातल्या हिंसेच्या बळी असणार्‍या 75 टक्के महिलांनी नवरा दारू पिऊन मारहाण करत असल्याचे सांगितले. 20 टक्के महिलांना त्यांच्या नवर्‍याकडून श्रीमुखात बसली आहे. कौटुंबिक हिंसेच्या बळी ठरलेल्या महिलांपैकी केवळ 9 टक्के महिलांनी मदत मागितल्याचे या अहवालात म्हटले आहे.

असेही आशादायक चित्र
एकीकडे कौटुंबिक हिंसेचे समर्थन करण्याची निराशाजनक बाब या अहवालातून स्पष्ट होत असतानाच एक सकारात्मक बाबही पुढे आली आहे. वंशाचा दिवा म्हणून कुटुंबात मुलगाच जन्माला यावा, ही भारतीयांची मानसिकता आता बदलत चालल्याचे आशादायी चित्र या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. देशातील 79 टक्के महिलांना आणि 78 टक्के पुरुषांना आपल्या घरी कन्यारत्न जन्माला यावे, असे वाटत आहे. देशातल्या 79 टक्के महिला आणि 78 टक्के पुरुषांना आपल्या कुटुंबात एक तरी मुलगी जन्मावी, असे वाटते. 15 ते 50 या सरासरी वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

ग्रामीण भागाची मानसिकता बदलतेय
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील सर्वाधिक महिला आणि पुरुषांची घरात धनाची पेटी जन्मावी अशी इच्छा आहे. तसेच श्रीमंतांपेक्षा गरीब कुटुंबीयांची मानसिकता मुलींच्या जन्माबाबत जास्त सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. वंशाला दिवा म्हणून एक तरी मुलगा असावा असे वाटणार्‍या 82 टक्के महिला आणि 83 टक्के पुरुष देशातल्या वेगवेगळ्या भागात आहेत. सर्वेक्षणात सांगितली जाणारी ही आशादायी माहिती जनगणनेतही दिसून येणे गरजेचे आहे.