चुंचाळेकरांनी राबविला ’लेकीचे झाड’ उपक्रम
यावल- तालुक्यातील चुंचाळे येथील लाडकी लेक सारीका नवर्याघरी नांदायला गेली खरी पण ती झाडाच्या रूपाने माहेरी कायमची एक आठवण ठेऊन. होय हे खरं आहे. महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्षारोपण उद्दिष्टात आपले गावही सहभागी व्हावे यासाठी चुंचाळे येथील ग्रामपंचायत व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यावल यांच्या संयुक्त विद्यमानाने व ग्रामस्थांच्या सहकार्यांने प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या संकल्पनेतून व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार यांच्या प्रयत्नातून ’लेकीचे झाड’ या सार्वजनिक उपक्रमाचा शुभारंभ येथील तेली समाजातील नववधू सारीका पद्माकर चौधरी या मुलीच्या लग्नाचे दिवशी तीच्या हाताने गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या परीसरात एक झाड लावुन त्यास पाणी घालून करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाचा मान येथील तेली समाजातील सारीका या नववधुस मिळाला.
एका नाविण्यपूर्ण या उपक्रमात झाडा भोवती सुरक्षा रक्षक जाळी बसवून त्या जाळीवर एक बाय 1.5 फूट आकाराचा बोर्ड लावून त्यावर ’लेकीचे झाड’ चि.सौ.का. सारीका पद्माकर चौधरी , विवाह दिनांक 7/05/2018 असे त्यावर लिहिले आहे. या उपक्रमात लावलेल्या झाडाचे आई-वडीलांनी आठवड्यातुन दोन दिवस पाणी टाकुन मुलीप्रमाणे संगोपन करायचे असून लग्नानंतरही मुलीची आठवण गावात कायमस्वरूपी शिल्लक राहील व झाडांमुळे सावली बरोबरच पर्यावरण संवर्धनदेखील होईल असे या ‘लेकीचे झाड’ या सार्वजनिक उपक्रमाचा हेतू आहे. प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या शुभहस्ते झाड लावण्यात आले व नंतर झाडाला पाणी नव वधू व तिचे काका युवराज चौधरी यांनी टाकले तर ग्रामपंचायतीकडून उपसरपंच आरमान तडवी यांनी शाल व श्रीफळ देऊन नववधूचा भाऊ उदय चौधरी याचा सत्कार करण्यात आला. सरपंच सुनंदा पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान कोळी,उपसरपंच अरमान तडवी, यावल तालुका राष्ट्रवादी सोशल मिडीया अध्यक्ष विनोद पाटील, सदस्य सुकलाल राजपुत, ग्रामरोजगार सेवक दीपक कोळी, ग्रामसेवक जयवंत पाटील, रामराज्य ग्रुप, रहेमान तडवी, युवासेना अध्यक्ष लिलाधर धनगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.