नववर्षाच्या मुहूर्तावर खान्देशवासीयांना राजधानी एक्सप्रेसची भेट

0

खासदार रक्षा खडसेंच्या मागणीची रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडून दखल

भुसावळ- नववर्षाच्या मुहूर्तावर खान्देशवासीयांतील रेल्वे प्रवाशांसाठी खुषखबर असून मुंबई ते नवी दिल्ली व्हाया भुसावळ अशी राजधानी एक्सप्रेस सुरू करण्यासंदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक दर्शवली आहे तर या एक्स्प्रेसला नाशिकसह चाळीसगाव, जळगाव, भुसावळ आदी ठिकाणी थांबा देण्याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी विनंती केली आहे. त्यास रेल्वे मंत्री यांनी अनुकूलता दर्शवली आहे. लवकरच मुंबई ते नवी दिल्ली व्हाया भुसावळ अशी राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून एकदा सुरू होण्याचे संकेत आहेत.

खान्देशातील रेल्वे प्रवाशांची होणार सोय
नाशिक हे अ दर्जाचे स्थानक असून औद्योगिक क्षेत्र, धार्मिक, स्थान, आर्मी व एअर फोर्स चे बेस स्टेशन, शैक्षणिक सुविधा, द्राक्ष आणि कांदे या कृषी क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे तर चाळीसगाव हे अ दर्जाचे स्टेशन असून जगप्रसिद्ध एलोरा लेणी इथून फक्त 60 किमी अंतरावर आहेत. धुळे जिल्ह्याशी जोडले असून धुळेवासीयांना सुद्धा या गाडीच्या थांब्याचा लाभ मिळणार आहे. जळगाव स्थानक हे अ दर्जाचे स्थानक असून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी फक्त 60 किमी अंतरावर आहेत. खान्देशातील व्यावसायिक, व्यापारी, मंत्री, खासदार, आमदार, पर्यटक, संरक्षण अधिकारी, विद्यार्थी यांना नेहमी दिल्ली येथे कामासाठी ये जा करावी लागते परंतू राजधानी सारखी एकही प्रीमियम सुपरफास्ट गाडी या मार्गावर नसल्या कारणाने या सर्वांची गैरसोय होते. खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये या राजधानी गाडीची मागणी केलेली होती. याची माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेऊन एक एसी ट्रेन ट्रायल बेसिस वर चालू केली होती. या ट्रायल ट्रेन मुळे राजधानी गाडीच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रात प्रथमच राजधानी एक्सप्रेसची भेट खान्देशवासीयांना मिळणार आहे. लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री ना.पियुष गोयल यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवून ही राजधानी एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.