नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटे पाचपर्यंत हॉटेल सुरु 

0
पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची माहिती
पिंपरी चिंचवड : “नववर्षाच्या स्वागतासाठी सरकारने पहाटे पाचपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचा अध्यादेश काढला आहे. यामुळे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल,’’ अशी माहिती पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली आहे. रात्री दीडपर्यंत दारूची दुकाने आणि हॉटेलला परवानगी असते. मात्र, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दारू विक्रीच्या दुकानांना पहाटे दीडपर्यंत; तर परमीट रूम, बिअर बार आणि हॉटेलकरिता पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी…
पोलीस आयुक्त म्हणाले की, “सरकारने काढलेला अध्यादेश आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही. तरीही अशा प्रकारचा अध्यादेश असल्यास तो मिळवून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.’’ यामुळे आता नववर्षाचा जल्लोष पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले. या दिवशी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गस्तही वाढविण्यात येणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणार्‍या आणि दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांवर पोलिस कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.