नववर्षाला ‘नवचैतन्याची गुढी’ ; लाखो रुपयांची उालाढाल

0

वाहन बाजाराचा ‘टॉप’ गियर ; सोने बाजारासह इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये आली तेजी

भुसावळ : हिंदू नववर्ष व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जीएसटीसह नोटबंदीच्या कारणास्तव गेल्या वर्षभरापासून सर्वच क्षेत्रात मंदिचे सावट असलेतरी रविवारच्या सणामुळे मात्र व्यापारी वर्गात दांडगा उत्साह दिसून आला. अर्थात त्याला कारण बाजारपेठेत झालेली लाखो रुपयांची उलाढालही होती. मुहूर्तालाच वस्तू खरेदीचा सर्वसामान्य नागरीकांचा कल असल्याने दुचाकी, चारचाकीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह सोने खरेदीवर नागरीकांना भर दिला तर आपल्या हक्काचे स्वतःचे घर व्हावे, असे स्वप्न बाळगून ते पूर्ण झाल्याने अनेकांनी गृहप्रवेशाची रविवारी गुढीदेखील उभारली तर अनेकांनी या दिवसाचे औचित्य साधून घरांसह प्लॅटदेखील बुक केल्याचे सांगण्यात आले.

बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल
शहरात हिंदू नववर्षानिमित्त उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे़ नागरिकांकडून विविध वस्तुंच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आले.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नागरीकांची सर्वाधिक मागणी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना राहिली. टीव्ही, फ्रीज, एअर कंडीशनर यासह विविध वस्तूंची खरेदी करण्यात आली शिवाय दुचाकी व चारचाकी खरेदीदेखील मोठ्या प्रमाणावर झाल्याने लाखो रुपयांची उलाढाल झाली. त्या शिवाय सोने बाजारात मोठी उलाढाल झाली.

घराचे स्वप्न झाले साकार
शहरात गृहखरेदीचा कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या मंदीनंतर रिअल इस्टेटमध्ये हळूहळू चैतन्य येत असून, यंदा मध्यमवर्गीयांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. स्वत:चे घर असावे, ही प्रत्येकाचे इच्छा असते. त्यातही शहरात घर खरेदीचा आनंद वेगळाच असतो. ती फक्त राहण्याची सोय नाही, तर एक मोठी आर्थिक गुंतवणूक ठरते. त्यामुळे इतर स्थावर संपत्तीपेक्षा गृहखरेदीकडे प्रत्येकाचा ओढा असतो. मागील दोन वर्षांत रिअल इस्टेटमध्ये मंदीचे वातावरण आले. नोटाबंदी, रेरा कायदा, जीएसटी आदी कारणांमुळे व्यवहार ठप्प झाले. बाजारात चलन फिरत नसल्याने सर्वच घटकांवर कमी-अधिक प्रमाणात परीणाम झाला परंतु मागील वर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे ही मंदी काहीशी धुतली गेली. गेल्या सहा महिन्यांत बाजार पूर्वपदावर येत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. त्यातही समाजातील सर्वच घटकांसाठी सध्या घर खरेदीला योग्य वातावरण आहे. घटलेला व्याजदर, सरकारी अनुदान, घरांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता अशा सर्वच बाजूंनी घर खरेदीचा मुहूर्त जुळून येत आहे. त्याचा पुरेपूर फायदा या गुढीपाडव्याला उचलण्यात आला.