मुंबई – नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन परिषद आणि युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड (युनिसेफ) यांच्या संयुक्तविद्यमाने एक करिअर पोर्टल सुरु करण्यात आले आहे. महाकरिअरपोर्टल असे या पोर्टलचे नाव आहे. दहावी आणि बारावीनंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याबाबतचे मार्गदर्शन या पोर्टलवरून करण्यात येणार आहे.
या पोर्टलचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या २७ मे पासून विद्यार्थी या पोर्टलवर लॉगइन करू शकणार आहेत. लॉगइनसाठी त्यांना त्यांचा विद्यार्थी सरल आयडी क्रमांक वापरायचा आहे. विद्यार्थ्यांनी हा सरल आयडी जाणून घेण्यासाठी शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये ५०० विविध करिअरबद्दलची माहिती अपलोड करण्यात आली आहे. राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या सुमारे ६६ लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा लाभ घेता येणार आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, महाविद्यालयांची माहिती शोधण्यास या पोर्टलची मदत होणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे पोर्टल उपलब्ध आहे.