नवापूर । शहरातील शास्त्रीनगर व जनता पार्क गल्ली नंबर 1 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याची ओरड आहे. या भागात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तक्रारी केल्या की एक-दोन दिवस पाणी पुरवठा नियमित होतो. परंतु काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करुनदेखील नगरपालिका प्रशासनाकडून याबाबत कोणती ही कायमस्वरुपी उपाय योजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
भाजपाचे मुख्याधिकार्यांना निवेदन
शास्त्रीनगरच्या शेवटच्या गल्लीत नवीन पाईपलाईन करुन द्यावी, अशी मागणी करुनदेखील ती पूर्ण झालेली नाही. मार्च महिन्यात पाईपलाईन करुन देऊ, असे आश्वासन देऊन वेळ मारुन नेली. मे महिना आला तरी पाईपलाईन टाकलेली नाही. आश्वासन देऊनदेखील पाण्याचा प्रश्न सोडविलेला नाही. याबाबत काही एक हालचाल नाही, असे निवेदन भाजपाने मुख्याधिकारी यांना दिले आहे. पाण्याचा प्रश्न 15 दिवसात सोडविला नाही तर नगरपालिके विरुध्द आंदोलन करुन निषेध करु, असे निवेदनात म्हटले आहे.
शास्त्रीनगर व जनता पार्क भागातील काही घरांचा पाण्याचा प्रश्न होता; तो सोडविण्यात आला आहे. पाणी पुरवठ्याबाबत मी स्वत: लक्ष घालून आहे. शास्त्रीनगरच्या शेवटच्या गल्लीत पाईपलाईन करुन देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून ते काम लवकरच होणार आहे. पाणी पुरवठा समितीच्या बैठकीत पाणी पुरवठाबाबत माहिती दिली आहे.
-विशाल सांगळे, नगरसेवक